अकोला - मी महायुतीचा घटक म्हणून माझी विचारपूस करायला हवी होती. मी हतबल म्हणून नव्हे तर राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी माझी विचारपूस करणं गरजेचे होते. मुख्यमंत्री त्या पदावर बसलेले असताना सामान्य जनता असो, सत्ताधारी, विरोधी आमदार असो त्यांच्यावर नपुंसक हल्ला करणारे गुंड लावारिस सुटतात त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करायला हवी होती. मात्र दुर्दैवाने हे घडलं नाही असं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराजी व्यक्त केली.
मनसे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मिटकरींनी आरोपींना अटक करावी यासाठी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अकोला पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे. आरोपी पंकज साबळे याचे अनेक स्थानिक नेत्यांशी लागेबंध आहेत. मी अल्पसंख्याक समाजाचा, सामान्य कुटुंबाचा आहे म्हणून हल्ले करता, तो आरोपी पोलिसांचा मालक लागून गेला का, त्याला मोकाट सोडलं आहे. आता आर या पार, ज्याप्रमाणे राज ठाकरेवर बोलल्यावर त्याचे टुकार गुंड बोलतात, तसं अजितदादांवर बोलल्यावर पक्षाच्या आमदारांनी, नेत्यांनीही तोंड उघडावं. कोण कुठचा राज ठाकरे, थेट अजितदादांवर बोलतो अशा शब्दात मिटकरींनी राज ठाकरेंवरही प्रहार केला.
तसेच माझा पोलिसांवर विश्वास नाही, भारतीय संविधानावर विश्वास आहे. त्यानुसार मी आंदोलन करतो. मला अडकवा, मला संविधानाने न्याय दिलाय त्यामुळे मी आंदोलनाला बसलोय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हल्ला झाला, आरोपी मोकाट फिरतोय. एकतर मी जिवंत राहीन नाहीतर तो जिवंत राहील, एकदा काय ते होऊन जाऊ दे, याची जबाबदारी पोलिसांची असेल अशी आक्रमक भूमिकाही आमदार अमोल मिटकरींनी घेतली.
दरम्यान, पोलिसांना पाठबळ कुणाचे, आज काहीही झालं तरी मी मरेन नाहीतर यांना मारेन, सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला, अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला तरीही अकोला पोलीस गांभीर्याने घेत नाही. अकोल्यात किती संशयास्पद मृत्यू झालेत, यावर प्रश्नचिन्ह आहेत. राजकारण चुलीत गेलो, मी मेलो तर माझ्या पोरीचं काय, माझ्या पोरांच्या जीवावर बेतलं, राजकारण गेले खड्ड्यात, महायुती बाजूला ठेवा. मीपण रस्त्यावर उतरलोय बघू आता असं सांगत अमोल मिटकरींनी मनसेवर कडाडून टीका केली.