मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहेत. मात्र त्यापूर्वी भाजप-शिवसेनेने फोडाफोडीचे राजकरण करत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना पक्षप्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु असताना, सोपल यांनी निर्धार मेळावा घेत आठ दिवसातच निर्णय घेण्याच्या खुलासा केला आहे. त्यामुळे सोपल हे पक्षप्रवेशाच्या बाबतीत काय निर्णय घेणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार सोपल हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. तसेच राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुद्धा त्यांनी दांडी मारली होती. त्यातच सोपल यांनी आता आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी सोपल यांना शिवसेनेत जाण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी आठ दिवसांचा कालवधी द्या असे भावनिक आवाहन आमदार सोपल यांनी केले आहे.
आमदार सोपल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखे जातात. सोपल हे बार्शी मतदारसंघात १९८५ पासून २००४ सोडले तर सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विविध मंत्रालयांची जवाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसणार आहेत.
युतीच्या नियमानुसार बार्शी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यातच सेनेतून विधानसभा उमेदवारीसाठी हक्क गाजवणारे माजी आमदार राजा राऊत हे आता भाजपमध्ये गेले असल्याने, आमदार सोपल यांचा मोर्गे मोकळा झाला आहे. त्यामुळे सेनेत गेल्यावर त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे आठ दिवसांनी आमदार सोपल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.