जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:55 PM2024-01-24T15:55:47+5:302024-01-24T15:56:31+5:30

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

NCP MLA Disqualification: Jayant Patil is not an elected state president; Ajit Pawar group claim | जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून जयंत पाटलांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून ते निवडून आलेले नाहीत. जयंत पाटलांचा कार्यकाळ २०२२ मध्येच संपुष्टात आला असं अजित पवार गटाने सांगितले. 

तर ३ वर्षासाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू असतो असं जयंत पाटलांनी म्हटलं. तसेच मी निवडून आलेलो आहे. मला प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांनीच पाठवले असंही त्यांनी उलटसाक्षीत म्हटलं. तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता आणि तुमची निवड कशी झाली असा सवाल अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना केला. त्यावर मी प्रदेशाध्यक्ष पदावर होतो. २०१८ मध्ये निवडणूक झाली त्यात माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. २०२२ मध्ये राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. माझ्या निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांच्याकडून मला मिळाले असं साक्षीत पाटलांनी सांगितले. 

तसेच कमिटीचा कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो. मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरू होती. मात्र कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो असे नाही. जोपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड कायम राहते असं जयंत पाटलांनी सांगितल्यावर अजित पवार गटाच्या वकिलांना पुन्हा प्रश्न विचारला. २०२१ मध्ये सुरू झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली की ती अजूनही सुरू आहे? त्यावर ही प्रक्रिया सुरू आहे. काही लोक पक्षातून बाहेर गेल्यानं प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक रखडली. पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत जितेंद्र आव्हाडांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या असून त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आली आहेत. ज्या दोन व्यक्तींवर जबाबदारी होती त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचे आव्हाड यांनी आरोप केला. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले आहेत. संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही, असे आव्हाड म्हणाले. 

Web Title: NCP MLA Disqualification: Jayant Patil is not an elected state president; Ajit Pawar group claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.