https://www.lokmat.com/topics/maharashtra-government/मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 13 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर 'मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, गेल्या 32 वर्षे शरद पवारांसोबत काम केलं आहे. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करताना सगळे मोठे पोर, सर्व साखर कारखानदार, सर्व मोठी लोक आजूबाजूला असताना सर्वसामान्य परिस्थितीतून येथे येताना पवारांनी हाताला धरुन किंवा करंगळीला धरुन चालवलं. त्याबद्दल कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
तर यावेळी तुम्हाला कोणतं मंत्रिमंडळ आवडले असे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब आणि तुम्ही विचारता कोणंत मंत्रिमंडळ देऊ, असे आव्हाड म्हणाले.
मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.