राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच, 'त्या' वेळी नेमके काय घडले? यासंदर्भात आता स्वतः जितेंद्र आव्हाड यांनीच स्पष्टपणे भाष्य केले आहे.
यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, "त्या बाईंना असं कुणी काय शिकवलं, की त्यांनी माझ्यावर हा गुन्हा टाकला. हेच मला कळत नाही. मी तो व्हिडिओ १० वेळा बघितला. त्यात ती बाई समोरून चालत येताना दिसते आहे. मी कोपऱ्यात जातो. तिला असं बाजूला व्हा, गर्दीत जाऊ नका असं, गर्दी आहे, भरकटू नका कुठे आणि मी तसाच पुढे जातो. एवढेच नाही, तर, समजा मी तसाच उभा राहिलो असतो, तर ती बाई माझ्या अंगावरच आपटली असती आणि नको तो आरोप झाला असता. म्हणजे, नुसतं असं बाजूला केलं तर एवढा आरोप झाला. जर मी असाच उभा राहिलो असतो तर, त्या अंगावरच आल्या असत्या. म्हणजे, एकतर आपण कुठल्या दिशेला चालत जातोय हे त्या बाईंच्या लक्षात नव्हते. दुसरे एवढ्या गर्दीत येण्याचे त्यांना काही कारण नव्हते, असेही आव्हाड यांनी म्हणाले. ते टीव्ही ९ मराठी सोबत बोलत होते.
माझ्या मनाची आत तयारी झाली आहे, हे सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार -पुढची तयारी आणि अटकपूर्व जामिनासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, पुढील न्यायिक भूमिकेसंदर्भात काय करायचे, ते वकील ठरवतील. माझ्या मनाची आत तयारी झाली आहे. की हे सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे. किती दिवस ते सांगता येणार नाही. मी सर्व प्रकारची मनाची तयारी केली आहे. माझ्यावर ज्या पद्धतीने दोन गुन्हे दाखल झाले. पहिल्या गुन्हात ज्या पद्धतीने कलम बदलण्यात आले आणि मुद्दाम एक नॉनबेलएबल कलम टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, विनयभंगाचा आरोप होतो. त्याचे विटनेस तपासले जात नाही. व्हिडिओ तपासला जात नाही. त्यातील शब्द तपासले जात नाहीत आणि थेट गुन्हा दाखल करता? विनय भंगाचं लॉजिकल मिनिंग काय? हे तरी समजून घ्यायला हवे होते. आपण काहीच न करता माझ्या सारख्याला आत फेकून देता? हे सर्व अनाकलनीय आहे. हे माझ्या बुद्धीच्या पलिकडचे आहे. मी असे राजकारण बघितले नाही. मी चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. मला पवार साहेबांसोबत ३५ वर्ष झाली आहेत. एवढे घाणेरडी राजकारणाची पातळी मी आयुष्यात बघितली नाही.
लढावं तर लागेलच... न लढता निपचित पडणं, आपल्या धर्मात नाही -पुढच्या भूमिकेसंदर्भात बोलताना, आव्हाड म्हणाले, राजकारणाचे डायनामिक्स दर मिनिटाला बदलतात. त्यामुळे परिस्थिती नुसार निर्णय घेऊ. एवढेच नाही तर, मराठीत एक म्हण आहे, आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे शेवटी आला अंगावर तर शिंगावर घ्यावाच लागेल ना. लढावं तर लागेलच. न लढता निपचित पडणं, हे आपल्या धर्मात नाही. लढून मरीन, पण कुणाच्या पायाशी शांत बसून जिवंत राहण्यापेक्षा, समोरच्याला आव्हान देत मी माझं मरण पत्करीन, असेही जितेंद्र आव्हा यांनी म्हटले आहे.