गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जितेंद्र आव्हाड आणि हर हर महादेव शो बंद पाडण्याच्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले आहे. आज सकाळीच आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या नव्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, रस्ता अडविण्याच्या घटना घडल्या आहेत. विनयभंगाच्या घटनेवेळचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी राजीनाम्याची घोषणा करत असताना म्हटले आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एका गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेनं आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
काय आहे त्या व्हिडीओमध्ये...ही महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कारसमोर डाव्या बाजुला उभी होती. आव्हाडांना पोलीस तिथून बाहेर काढत होते. तेव्हा ही महिला त्यांच्या वाटेत आली. आव्हाड यांनी तिला उद्देशून, ''एवढ्या धक्काबुक्कीत कशाला येता, जरा साईडला रहा'', असे म्हणत त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला धरून बाजुला केले.
आव्हाडांची पत्नी ऋता सामंत यांची प्रतिक्रिया...
"जे काही घडलं ती Spontaneous Reaction होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही" असं म्हटलं आहे. ऋता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.