काल अजितदादांच्या शपथविधीला अन् आज शरद पवारांच्या स्वागताला; 'या' आमदाराच्या मनात काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:01 AM2023-07-03T11:01:58+5:302023-07-03T11:02:58+5:30
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणी करू अशी घोषणा केली आहे.
सातारा – राष्ट्रवादी नेते अजित पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रविवारी राज्याच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला. त्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडेंसह इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेला पक्षाच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप समोर आले नाही. परंतु एक आमदार जे अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते तेच आज शरद पवारांच्या स्वागतासाठी पुढे आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रविवारी राजभवनावर शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणारे साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील हे आज शरद पवारांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आमदार साहेबांच्या बाजूने की दादांच्या बाजूने असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात शपथविधीला गेलेले अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचे शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यात आमदार मकरंद पाटील यांनी साताऱ्यात शरद पवारांचे स्वागत केले त्यानंतर पवारांच्या गाडीत बसून ते पुढे रवाना झाले. त्यामुळे काल अजितदादांसोबत अन् आज शरद पवारांसोबत असलेले मकरंद पाटील नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
शरद पवारांचा कराड दौरा
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणी करू अशी घोषणा केली आहे. त्यात आज शरद पवार कराड येथील माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होणार आहेत. त्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांना शरद पवार संबोधित करणार असल्याचेही बोलले जात आहे. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. त्याचसोबत प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही असा आरोपही पवारांनी केला.
अजितदादांसोबत किती आमदार?
रविवारी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार, प्रफुल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पत्रकारांनी अजित पवारांना तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा प्रश्न केला. त्यावर कुठलीही संख्या न सांगता सर्वच आमदार आपल्या पाठिशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहे. आम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे असं सांगत अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे.