Prakash Solanke Dhananjay Munde: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते आणि लोक सामील झाले. या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला चार वर्षे पालकमंत्री भाड्याने दिले होते, असा गंभीर आरोप आमदार सोळंके यांनी केला. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी सोळंकेंनी केली.
बीडमधील आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, "संतोष देशमुख यांची हत्या होऊन २१ दिवस झाले, तरी काही आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना अटक झालेली नाही. खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड यालाही अटक झालेली नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, गेल्या पाच वर्षात चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पंकजा मुंडेंनी सांगितले की धनंजय मुंडेंनी आपले पालकमंत्रिपद भाड्याने दिले. कोणाला दिले, वाल्मिक कराडला दिले. एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर याने (वाल्मिक कराड) पोलीस प्रशासन आणि संपूर्ण प्रशासनावर आपली जरब बसवली", असे गंभीर गौप्यस्फोट आमदार सोळंके यांनी केले.
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत न्यायाची अपेक्षा नाही -आमदार सोळंके
"फोन करून सांगायचे की, याला उचला. ३०७ मध्ये अडकवा, ३०२ मध्ये अडकवा. हजारो निर्दोष लोकांवर खटले दाखल केले. गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा (ट्रक) वाळू उपसा करतात. या हायवा कोणाच्या आहेत? या सर्व गोष्टींना ज्यांनी वाल्मिक कराडच्या पाठिमागे आपली शक्ती उभी केली. ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास या प्रकरणात कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. मी मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) आणि अजित पवारांना विनंती करतो की, या प्रकरणात जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं. एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे. ही बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांची मागणी आहे", असे प्रकाश सोळंके म्हणाले.
...यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागणार -आमदार सोळंके
"सगळ्यांना विनंती करायची आहे की, हा मूक मोर्चा हे पहिलं पाऊल आहे. न्याय मिळाला नाही, तर यापेक्षा मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळ जवळ ४० लाखांचा निधी आम्ही ४ जानेवारीला मस्साजोगला जाऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करणार आहोत", असे प्रकाश सोळंके म्हणाले.
दोन छोटी मुलं आहेत. म्हातारे आईवडिल आहेत. भाऊ आहे, त्या भावाचं कुटुंब आहे. त्या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की, माझं कुटुंब आहे. जी काही मदत आपल्या हातून केली पाहिजे", असे आवाहन प्रकाश सोळंके यांनी केले.