मुंबई: भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि कोश्यारी यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन संघर्ष सुरुच असतो. कोणत्याही निर्णयावरुन राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद होत असतात. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांवरुन गेल्या एक-दीड वर्षांपासून वाद सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी नेते आणि कोश्यारी यांच्यात सतत वाद होत असतात.
यातच आता भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर अनेक नेते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोश्यारींना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. "छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
ट्विटमधून खोचक टोलारोहित पवार पुढे म्हणतात की, "घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा", अशा खोचक शुभेच्छा रोहित पवारांनी दिल्या. यावर अद्याप राज्यपाल कोश्यारींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जयंत पाटलांच्या शुभेच्छाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट केले, "महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री. भगतसिंह कोश्यारी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा." उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरवर याचे फोटोही शेअर केले. "मुंबई येथे राजभवनात राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी जी यांची सदिच्छा भेट घेतली; त्यांना वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर साहेब देखील उपस्थित होते," असे अजित पवार म्हणाले.