...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:37 PM2024-01-06T13:37:20+5:302024-01-06T13:48:55+5:30
आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची असल्याने आम्ही भाजपसोबत गेलो नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.
NCP Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर कथित शिखर बँक गैरव्यवहाराप्रकरणी शुक्रवारी ईडीने छापेमारी केली. रोहित पवारांच्या बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापलं असून आज पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली. तसंच सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
घरभेदी लोकांमुळे रोहित पवार यांच्या कारखान्यांवर ईडीने छापेमारी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, "या विषयावर मला फार भाष्य करायचं नाही. मात्र मागील सात दिवसांत भाजपचे आणि अजितदादा मित्र मंडळाचे कोणकोणते नेते दिल्लीला गेले होते, याचा तपशील काढल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळतील. आज सत्तेतील नेते फार मोठमोठ्या आवाजात बोलत आहेत. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, मी खरंच चूक केली असती तर काल परदेशात असतानाही कारवाईनंतर इथं आलो नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजितदादांसोबतच भाजपबरोबर गेलो असतो. परंतु मी असं काहीही केलेलं नाही. कारण आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे," असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांवरही पलटवार
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल रोहित पवारांवर निशाणा साधला होता. "आजकाल ईडीच्या नावाने शहीद होण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. मात्र ज्यांनी चूक केली नसेल त्यांनी घाबरण्याचं कारण नाही," असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, "राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. गृहमंत्री ज्या शहरात असतात तिथेच लोकांचे खून होऊ लागले आहेत. इतर नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यस्थेवर लक्ष द्यावं आणि ही जबाबदारी पेलत नसेल तर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान, "लोक खूप हुशार आहेत. या सर्व कारवाया ते उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. काही लोकांना यावरून राजकारण करायचंय," असंही रोहित पवार म्हणाले.