Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यासह देशातील अनेक ठिकाणी लम्पी या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रशासनाकडून यावर अनेक उपाय केले जात आहेत. मात्र, यावरून राजकारणही तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, ‘गोधन खतरे में’ म्हणणारे लम्पी आजारावर एक शब्दही बोलत नाहीत, या शब्दांत निशाण साधला आहे.
राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही, असा टोला रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला. एकीकडे रोहित पवारांनी भाजपवर टीका करताना, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मात्र त्यांनी कौतुक केल्याचे सांगितले जात आहे.
अतिरिक्त मदत मिळणे गरजेचे आहे
देशात ८२ हजार जनावरे लम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरे लम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे. मृत पावलेल्या पशुधनास एनडीआरएफच्या निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून ३० हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने हे निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अतिरिक्त मदत मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
दरम्यान, राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडे लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, असे सांगत रोहित पवार यांनी टीका केली.