मुंबई: नेत्यांचे फोन टॅप करण्याला चाणक्यनीती म्हणत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. काही जण वैयक्तिक फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करतात. जनतेचा विश्वास उडाल्यावर फोन टॅपिंगसारख्या गोष्टी करण्याची गरज भासते, असं रोहित पवार म्हणाले. फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन रोहित पवारांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.राजकारण करायचे वेगवेगळे प्रकार असतात. काही जण जनहिताचे निर्णय घेतात. मग जनताच अशा नेत्यांना निवडून देते. त्यांच्या पाठिशी उभी राहते. मात्र काही जण वैयक्तिक हितासाठी सत्ता राबवतात. त्यामुळे अशा मंडळींचा जनाधार कमी होतो. मग निवडणूक जिंकण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या पद्धतींचा आधार घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या राजकारणाला चाणक्यनीती म्हणत नाहीत, अशी शब्दांत रोहित पवारांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली. भाजपाला फोन टॅपिंगची गरज का भासली, असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला. भाजपा लोकशाही मानत नाही. ते फक्त दडपशाही मानतात, असं रोहित पवार म्हणाले. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणात लक्ष घालत आहेत, असं त्यांनी सांगितलं. इतक्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत असतील, तर मग इतरांचं काय, असा प्रश्नदेखील रोहित यांनी विचारला. भाजपा सरकारकडून सर्वसामान्य जनतेवरदेखील नजर ठेवली गेली असावी, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली.
काय आहे प्रकरण?फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत.