कर्जत :
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. यातच राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडलेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. राज्यात आतापर्यंत डझनभर मंत्री आणि अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, केसी पाडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह एकूण १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याशिवाय भाजपा आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.