मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl Land Scam) 100 दिवसांनंतर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वाघ पिंजऱ्यातून बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे आणि या पोस्टला 'सत्यमेव जयते' असा हॅशटॅग वापरला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, 31 जुलैला अटक झाल्यापासून संजय राऊत हे कोठडीतच होते. सुरूवातीला ते ईडीच्या कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे न्यायालयाकडून वाचन करण्यात आले. त्यात कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.
शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले - सुषमा अंधारे आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण असून शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.