Rohit Pawar Vs Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून संधी मिळताच एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. सध्या जागावाटपावरून महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित जागा मिळवण्यासाठी कराव्या लागत असलेल्या संघर्षावरून त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील," असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवारांचा पक्ष सहा जागांवर ठाम
महायुतीच्या जागावाटपात बारामती, सातारा, रायगड, शिरुर या चार जागांव्यतिरिक्त धाराशिव आणि परभणी यासह सहा जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम आग्रह आहे. बुलढाणा, नाशिक या जागांसाठीही राष्ट्रवादीने आग्रह धरला आहे. मात्र, या जागा मिळाल्या नाहीत तरी चालेल, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला लक्षद्वीपची जागा मिळणार आहे.