अकोला:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना कार्यक्रमादरम्यान अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात घडली. यावेळी व्यासपीठावर बोलत असताना मिटकरींना अचानक अर्धांग वायूचा झटका आला यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, हा झटका सौम्य असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती स्वतः अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं? काल राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. यावेळी अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 'माझी मैना गावाकड राहिली' ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. यावेळी अचानक त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला आणि तोंड किंचित वाकडे होत असल्याचे उपस्थितांच्या लक्ष्यात आले. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे मिटकरींनी सांगितले. तसेच, स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंतीही मिटकरींनी केली.