“पितृतुल्य गुरुंना निवृत्तीचा सल्ला दिला जातो, अशांना श्रीराम कसे पावतील?”: अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:27 AM2024-01-05T11:27:44+5:302024-01-05T11:27:52+5:30
NCP MP Amol Kolhe News: आता पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो, असे सांगत अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली.
NCP MP Amol Kolhe News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून टीकास्त्र सोडले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातही खटके उडताना दिसत आहेत. यातच आता पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? अशी विचारणा खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
मीडियाशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, आमचा राम आमच्या हृदयात आहे, त्याच्यावर कुणाचीही मक्तेदारी नाही. प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत
प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असे म्हटले जाते. दोन माणसे भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसे जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत, अशी टीका अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना उद्देशून यांना केली.
दरम्यान, राम मांसाहारी होता, या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र प्रश्न हाच आहे की प्रभू श्रीरामांविषयी कुणी काय बोलायचे? हे जर काही ठराविक लोक ठरवणार असतील तर आम्ही म्हणतो की प्रभू श्रीराम आमच्या हृदयात आहेत. हृदयातल्या श्रीरामावर कुणीही मक्ता गाजवू नये अशी आमची सगळ्यांचीच भावना आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.