राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 04:22 PM2021-08-20T16:22:45+5:302021-08-20T16:25:02+5:30
Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोसदेखील घेतले होते.
"कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी परंतु प्रकृती स्थिर आहे," असं अमोल कोल्हे म्हणाले. "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा आणि सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावी. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावं," असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
देशात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत घट
देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९७.५७ टक्के जण बरे झाले. आजवर केलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ५० कोटींवर पोहोचली आहे. ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० जण बरे झाले आहेत. ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या १४९ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना कोरोना लसीच्या ५८.३१ कोटी डोसचा पुरवठा केला आहे. त्यातील ५६ कोटी २९ लाख डोसचा राज्यांनी वापर केला. वाया गेलेल्या डोसचाही या आकडेवारीत समावेश आहे.