कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोसदेखील घेतले होते.
"कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी परंतु प्रकृती स्थिर आहे," असं अमोल कोल्हे म्हणाले. "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा आणि सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावी. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावं," असं आवाहनही त्यांनी केलं आहे.