NCP MP Amol Kolhe News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे विधान केले. यावरून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर भाष्य केले आहे.
अलीकडेच खासदार सुप्रिया सुळेंना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा केली जाते. या एकंदरीत घडामोडींबाबत अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असे दिसते की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसे असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कृपया काही वेगळे अर्थ लावू नका
अजित पवार सुप्रिया सुळेंना कार्यध्यक्ष केल्यानंतर नाराज असल्याच्या चर्चा होतात. याबद्दल विचारले असता अमोल कोल्हे म्हणाले की, अजित पवारांच्या भाषणावेळी त्यांच्यामागेच बसलो होतो. त्यावरून मला तरी असे काही जाणवले नाही. त्यामुळे कृपया काही वेगळे अर्थ लावू नका, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले. तसेच त्यांना असे म्हणायचे असेल की, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असा कयास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहीचे म्हणणे आहे तू कडक वागत नाही. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय? आता बस झाले, मला यातून मुक्त करा. संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली.