Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांमुळे विरोधकांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. याशिवाय शिंदे गटावरही टीका केली जात आहे. यातच आता अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत, भाजपला छत्रपती शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय, अशी विचारणा केली आहे.
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत, असे सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले होते. सोशय मीडियावर हे विधान व्हायरल होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानांचा अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
भाजपला छत्रपती शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय?
सुधांशु त्रिवेदी यांचे वक्तव्य ऐकले आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमके खुपतेय काय यांना? कधी भाजपाचे प्रवक्ते बोलतात, तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात? वारंवार ही बेताल वक्तव्य महाराजांबद्दल का केली जातात? भाजपला शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय? माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, हे शिवरायांनी अधोरेखित केले ते भाजपला खुपते का? अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चालले आहे. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचे पाणी पाजण्याची वेळ आली, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात बोलताना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"