Maharashtra Politics: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना पाहायला मिळत आहेत. राज्यपालांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी, राज्यपालांनी पाठवलेले ते पत्र आताच कसे बाहेर आले, अशी विचारणा केली आहे.
राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरील तारीख पाहिली तर ते ६ डिसेंबर रोजीचे आहे. ते १२ डिसेंबर रोजी कसे बाहेर आले? यामागे नेमके काय राजकारण आहे? काय हेतू आहे, असा सवाल करत, जर राज्यपाल यांनी पत्रात लिहिलंय की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. असं असेल तर वारंवार तसी वक्तव्य का येतात? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. चंद्र-सूर्य आकाशात आहेत, तोपर्यंत त्यांचे तेच स्थान असेल. त्यामुळे शिवरायांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य का होतायत, याचेही उत्तर मिळणे अपेक्षित आहे, असे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात नेमके काय म्हटलेय?
माझ्या भाषणातील एक छोटा भाग काढून काही लोकांनी भांडवल केले. मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच मात्र तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असे विधान मी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो. पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे, असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषयच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी माझ्या भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"