औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबदमधील सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला. याशिवाय इतिहासावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्यावर टीका करणे हास्यास्पद असून, इतिहासाचा वापर देशहितासाठी व्हायला हवा, द्वेषासाठी नाही, या शब्दांत अमोल कोल्हेंनी राज ठाकरे यांना सुनावले आहे.
गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शरद पवार यांच्यावर आरोप होतो, तेव्हा त्याची पडताळणी व्हायला हवी. शरद पवार यांच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५५ टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. महिलांसाठी धोरण राबवणारे पहिले राज्य आहे. महिला धोरणाला जातीयवादी रंग देणे योग्य नाही. इतिहासाचा वापर देशहितासाठी व्हायला हवा, द्वेषासाठी नाही, या शब्दांत अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
समग्र प्रबोधनकार ठाकरे वाचावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देणाऱ्या शरद पवार यांना तुम्ही जातीयवादी म्हणता. राज ठाकरे यांनी समग्र प्रबोधनकार ठाकरे वाचावे, ज्यामध्ये जातीचा उल्लेख आहे, असा सल्ला अमोल कोल्हे यांनी दिला. चुकीचे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. शरद पवार कृषिमंत्री असताना देश पहिल्यांदा अन्नपूर्ण झाला, असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच राज्यात प्रथम एमआयडीसी आल्यावर तिथे नोकऱ्या देताना जाती-धर्माचा विचार केला नाही, असेही त्यांनी नमूद केले. टीव्ही९ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना चुकीचे फीड देण्यात आले आहे. सोशल मीडियावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अनेक दाखले देण्यात आले आहेत. शिवरायांची समाधी प्रथम महात्मा फुले यांनी शोधली. शिवजयंती महात्मा फुले यांनी पहिल्यांदा सुरू केली. ब्रिटीश सरकारने समाधी बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.