Abdul Sattar Controversy: एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. अतिशय अभद्र भाषेत अब्दुल सत्तार यांनी विधाने केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माफी मागितली असली, तरी राज्यात अनेक ठिकाणी अब्दुल सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रवादीने तीव्र निषेध व्यक्त केला. यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना अभद्र भाषेचा वापर केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महिला नेत्यांनीही या वक्तव्यावर आक्षेत नोंदवला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचा उल्लेख करत अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला.
नीच मानसिकतेचा तीव्र निषेध करतो
कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या माँ जिजाऊ एक महिलाच होत्या, ज्योतिबांना स्त्री शिक्षणासाठी साथ देणाऱ्या सावित्रीमाई एक महिलाच होत्या, लोककल्याणकारी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक महिलाच होत्या. इतिहासात डोकावून पाहिले तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधाने करणे निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो, असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. दुसरीकडे, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तृत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली असून याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे महिला आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"