सांगली -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात, मुंडे यांनी स्वतःच मंगळवारी (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेसोबतच्या आपल्या संबंधांची कबुली दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडें यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हे म्हणाले, "राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक, आमच्याकडून जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा करत आहेत, तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असाताना पाळली होती का? विरोधकांनी आधी स्वत:ला आरशात पाहावे." कोल्हे यांनी असे विधान करत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांची पाठराखणच केली आहे.
हे आम्हाला शिवभक्ती शिकवणार आहेत का? -औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरूनही कोल्हे यांनी भाजपला सुनावले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा कोण उचलत आहे, हे बघून मला अप्रुप वाटते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजांच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जीआर काढला, हे आम्हाला शिवभक्ती शिकवणार आहेत का? असा खोचक सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर - गायिका रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. तिने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. मात्र त्याआधी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देण्यास तयार नसतील, तर सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगायला हवे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात, ते योग्य निर्णय घेतील -धनंजय मुंडेंनी संवेदनशीलपणे निर्णय घ्यायला हवा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. धनंजय मुंडे यांच्या हातून चूक घडली आहे. माणसाच्या हातून चुका होत असतात. पण राजकारणाचे काही नियम आहेत. त्यात मुंडेंची चूक बसत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात. आतापर्यंत त्यांनी शुद्ध राजकारण केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील, असं पाटील यांनी पुढे म्हटलं.