Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे कराड येथे जाऊन शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात असताना आता दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अवघ्या काही तासांत यु टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासह ९ जणांनी घेतलेल्या शपथविधीवेळी महाराष्ट्राच्या राजभवनात उपस्थित होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तास उलटत नाहीत, तोच अमोल कोल्हे यांनी यु टर्न घेत शरद पवार यांच्याकडे परतले आहेत. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विटवरून माहिती दिली. मी साहेबांसोबत असा हॅशटॅग अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
मी साहेबांसोबत, अमोल कोल्हे शरद पवारांकडे परतले
अमोल कोल्हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जेव्हा मन आणि बुद्धी यांच्यात द्वंद्व पेटते, तेव्हा मनाचे ऐका. कारण कधी कधी बुद्धी नैतिकता विसरते. मात्र, मन कधीही नाही, असे कॅप्शन अमोल कोल्हे यांनी दिले आहे. तसेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण. कधी कधी सगळे विसरायचे पण बाप विसरायचा नाही, असे व्हिडिओत म्हटले आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याची कोणतीही कल्पना नव्हती. मी एका वेगळ्या विषयावर चर्चेसाठी अजितदादांकडे गेलो होतो, तेव्हा सुप्रिया सुळे यांनाही भेटलो. तेव्हा हा विषय माझ्यासमोर आला. आजच्या राजकारणात नैतिकता हरवलेली आहे. मी मनाचा आवाज ऐकला आणि शरद पवार यांना पाठिंबा दिला. नैतिकदृष्ट्या मला योग्य वाटले नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि कायम राहीन. शरद पवार यांची भेट घेणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितले.