NCP MP Dr Amol Kolhe On BJP Offer: अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार, नेते आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा केला होता. तसेच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरही सडकून टीका केली होती. यातच आता भाजपकडून तुम्हाला ऑफर आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत थेट भाष्य केले.
महाराष्ट्रात सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची खूप चर्चा आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यात प्रमुख भूमिकेत आहेत. या महानाट्याचे प्रयोग राजयभर सुरू आहेत. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, अलीकडेच लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांसमोर कौतुक केले. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. अमोल कोल्हे यांनी याला थेटपणे उत्तर दिले.
सध्या ऑफर एकच आहे...
पंतप्रधान मोदींनीच तुमचे कौतुक केले ही ऑफर नाही का? अशी विचारणा करण्यात आली. यावर बोलताना, पंतप्रधानांनी असे लोकसभेत कौतुक केले ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही, कोण म्हणते ही ऑफर आहे? मुळात ऑफर तर यायला पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या ऑफर एकच आहे, शिवपुत्र संभाजी हे नाटक पाहायला या, ते जास्त महत्त्वाचे आहे. राजकारण, राजकीय पदे या गोष्टी केवळ पाच वर्षांसाठी असतात. परंतु शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे लोकांच्या, लहान मुलांच्या काळजावर जे कोरले जाणार आहे ते जास्त शास्वत आहे, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आमदार नेहमीच संपर्कात असतात. सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपत येतील हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"