माझ्या राजा रं... चिमुकलीची दुडूदुडू पावलं पाहून कोल्हेंनी शेअर केला ‘लयभारी’ व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:18 PM2022-06-10T12:18:12+5:302022-06-10T12:19:36+5:30
व्हिडिओ एकदा पाहाच... चिमुकलीची शिवभक्ती पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ नाव जरी उच्चारलं तरी प्रत्येकाचा ऊर अगदी अभिमानाने भरून येतो. अलीकडेच शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर अगदी उत्साहात पार पडला. आज शेकडो वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांची मुसद्देगिरी, त्यांची कल्पकता, त्यांचे विचार प्रेरणाच देतात. प्रत्येक शिवप्रेमी आपापल्यापरिनं छत्रपती शिवारी महाराजांना मुजरा करत असतो. मात्र, यातच अलीकडे सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनाही हा व्हिडिओ ट्विटवरून शेअर करण्याचा मोह आवरला नाही.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून शेअर केलेल्या या व्हिडिओत एक चिमुकली दिसत आहे. ही मुलगी फक्त अडीच वर्षांची आहे. या मुलीचे नाव रुत्वी गजानन जैनोजी आहे. रुत्वी ही बेळगावमधल्या मच्छे येथे राहणारी आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ही चिमुकली हातात छत्रपतींची मूर्ती घेऊन गडावर जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती मूर्तीला अभिषेक करते आणि नंतर कुंकू लावते. मागे श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी हे गाणं वाजतंय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अमोल कोल्हेंनी या व्हिडिओला एक कॅप्शनही दिले आहे. मच्छे, बेळगाव इथल्या अडीच वर्षीय रुत्वी गजानन जैनोजी या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय!, असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणी ही भारावून जाईल. तसेच या शिवप्रेमामुळे प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम सर्वश्रुतच आहे. अमोल कोल्हेंनी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते. वीर शिवाजी या हिंदी मालिकेतही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं.
मच्छे, बेळगाव इथल्या अडीच वर्षीय रुत्वी गजानन जैनोजी या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 9, 2022
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩#जय_शिवरायpic.twitter.com/GLSSUzaSCl