Maharashtra Politics: विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळल्यापासून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला असून, आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे, असा खोचक टोला लगावला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात इन्कमिंगला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. याचाही सुप्रिया सुळे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. भाजपला ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचे काम केले ते कार्यकर्ते आज कुठे आहेत? अशी विचारणा करत त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरे वाटले. आमच्याकडे त्यांना काही कमी नव्हते. मात्र बरे झाले त्यांना दोन्हीकडे सन्मान मिळत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झाली
भाजप नेत्यांकडे बोलण्यासाठी आता काही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. भाजप आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री झाला आहे. ज्यांनी भाजपाला वाढवले, संघटना मजूबत केली. अगदी माईक लावण्यापासूनची कामे ज्या कार्यकर्त्यांनी केली, ते कार्यकर्ते कुठे आहेत? असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"