मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करेल. तसेच येणाऱ्या काळात इंधनावरील करात कपात केली जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिली होती. मात्र, यानंतर वीजदरवाढ, गॅसदर आणि दूग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्यांवर जीएसटी लावण्यात आला आहे. यावरून आता सुप्रिया सुळे नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत निशाणा साधला.
ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे
महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले आहे. ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ यंदाच्या वर्षात झालेली चौथी आहे. यामुळे सिलिंडरचे दर दिल्लीत १,०५३.०० रुपये, मुंबईत १०५२.५० रुपये आणि चेन्नईत १०६८.५० रुपये एवढे झाले आहेत. ज्या महागाईच्या मुद्द्यावर, गॅस दरवाढ, इंधन दरवाढीवर मोदी सरकार काँग्रेस आघाडीला हरवून २०१४ मध्ये सत्तेत आले त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांनी या गॅस दरवाढीवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एनडीएचे ९३ टक्के मतदारांनी आणि विरोधकांच्या ९४ टक्के मतदारांनी सरकारच्या या दरवाढीला विरोध केला आहे.