Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राज्यातील राजकारण सुरू झाली आहे. यावर आता प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठे काम या राज्यात आणि देशात उभे केले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळे मत आहे
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले. त्यामुळे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, मात्र, अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळे मत आहे, अशी सूचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तर दुसरीकडे, अजित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. एक गोष्ट खरी आहे की, आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो. ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. तिथपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चालले असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतेय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावे, आमच्यासारखे तर हतबलच झालेत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"