Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखीन वाढताना दिसत आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप तसेच शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरेंच्या विधानावरून दावे-प्रतिदावे करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत, ते कधी खोटे बोलत नाहीत, असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितलं होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
तो सुसंस्कृत, चांगला मुलगा आहे
मी आदित्य ठाकरेंना जे काही ओळखते, त्यावरून आदित्य ठाकरे साधा, सरळ आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्यांनी घरातील काही अनुभव सांगितला असेल तर तो खराच असेल. तो सुसंस्कृत, चांगला मुलगा आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाला एक प्रकारे पाठिंबा दिला.
दरम्यान, अजित पवार लवकरच भाजपाबरोबर जातील, तसेच शिंदे गटाचे १५ आमदार अपात्र ठरतील, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे प्रकरणी चर्चा होत असतानाच असताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मोठे विधान केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"