Supriya Sule News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे विधान केले. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले आहे.
मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहीचे म्हणणे आहे तू कडक वागत नाही. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय? संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक भाष्य केले.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार?
अजितदादाची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. अजितदादाला संघटनात्मक पदावर संधी द्यायची की नाही संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारलाय. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचे की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांचा या सरकार मध्ये सातत्याने अपमान होतो आहे. सरकारकडून अपमान केला जातोय, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
दरम्यान, गद्दार शब्द वापरला तर जेलमध्ये टाकू, असे म्हणत आहेत. गद्दार ही काही शिवी नाही. ते म्हणू शकतात, आम्ही नाही म्हणू शकत? आम्ही बोललो तर आम्हाला जेलमध्ये टाकणार, हे चुकीचे आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.