“भाऊ म्हणून मला विश्वास आहे, अजितदादा CM झाले तर पहिला हार मी घालेन”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:51 PM2023-10-05T17:51:25+5:302023-10-05T17:52:02+5:30
Supriya Sule: देवेंद्र फडणवीसांनी रोज शरद पवारांना नावे ठेवावीत. मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
Supriya Sule: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे बॅनर लागताना दिसत आहेत. राज्यात अनेक नाट्यमय आणि मोठ्या घडामोडींनंतर शिंदे-फडणवी-पवार सरकार सत्तेत आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गौप्यस्फोट करताना अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केले आहे. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत असून, अजित पवार जर मुख्यमंत्री झाले, तर पहिला हार मी घालेन, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची नैसर्गिक युती आहे. तर अजित पवार आमचे राजकीय साथीदार आहेत. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढली. तसेच अजित पवारांनीही साथ दिल्याने राजकीय अंकगणितही चांगले झाले आहे. ६ महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनायचेय तेव्हा अजित दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावर आता सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
भाऊ म्हणून मला विश्वास आहे
अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हापासूनच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले. याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन.देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नसेल. मात्र भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवारांना नावे ठेवावीत. मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. नांदेडची घटना वेदना देणारी आहे. मृतांचा वाढत जाणारा आकडा फार दुःखद आहेत. ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जाते. यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र नांदेडला येत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा निषेध करते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. मात्र मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसलेले आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.