Rajya Sabha Election 2022:महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. एकीकडे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्मार्ट खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना दुसरीकडे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला शुभेच्छा देत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असूनही ती संधी आम्ही घेतली नाही, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही, याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. शरद पवार म्हणालेत की, आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो
कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. भाजपने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आले आहे. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटामध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळाले ते एका अपक्ष आमदाराचे होते. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसे केले होते, असे शरद पवार म्हणाले.