रविवारी कार अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं निधन झालं. जेव्हा कारचा अपघात झाला तेव्हा मिस्त्री हे कारमध्ये मागील सीटवर बसले होते, परंतु त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. यानंतर रस्ते सुरक्षेवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकार कारमध्ये मागील बाजूला बसणाऱ्या लोकांसाठीही सीट बेल्ट अनिवार्य करण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सायरस मिस्त्री माझा मित्र, माझा भाऊ होता. आमचं एक प्रेमळ नातं होतं. माझ्या पतीसोबतही त्यांचं उत्तम नातं होतं. आमची मुलंही एकाच शाळेत शिकली आहे. त्यांचं निधन आमच्यासाठी धक्कादायक आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्याची संकेत दिले आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी एनडीटीव्ही इंडियाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. “नितीन गडकरींची मी सकाळीच आभार व्यक्त केले. संसदेत आम्ही केवळ भांडत नाही. गडकरी हे चांगल्या सूचना आणतात. देशहितासाठी आम्ही सर्व खासदार एकत्रच उभे असतो. आपण सुरक्षेबाबत बोलतो पण काही करत नाही. मी पण मागे सीट बेल्ट लावत नव्हते. परंतु सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली. आपण दुकाचीबद्दल तर बोलतच नाही. त्यातही सुरक्षेबाबत विचार करण्याची गरज आहे,” असंही सुळे म्हणाल्या.
“आता मी कोणाशीही बोलेन तर रस्ते सुरक्षेवरच चर्चा करेन. तुम्ही जरी चालत असाल तरी आता अलर्ट राहण्याची गरज आहे. मोटरसायकलवर अनेकदा लोक फोन कानाला लावून ती चालवत असतात. अपघात झाला तर आपण केवळ बदल करायचाय हा विचार करतो. हा जीवनाचा प्रश्न आहे. कृपया दुचाकी चालवताना मोबाईल वापरू नका,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. याबाबत आपल्याला विचार करण्याची गरज आहे. सुरक्षेला आपण भारतीय अधिक प्राधान्य देत नसल्याचंही त्या म्हणाल्या.
“माझ्या निवडणूक क्षेत्रात एका व्हॅनमध्ये १०-२० मुलं बसली होती. मी त्यांना थांबवलं आणि ओरडले. शाळेतही मी तक्रार केली. या गोष्टी आपण गांभीर्यानं घेत नाही. कोणी हेल्मेट घालून सायकल चालवली तरी आपम त्यांना हसतो. आपल्या स्तरावरही आपल्याला जबाबदारी समजून घ्यायला हवी,” असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.