Maharashtra Politics: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला. शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे पाच दशकांपासून ऋणानुबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी असून हे बाळासाहेबांना न आवडणारे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनाच तुम्ही विरोध करत आहात हे स्पष्ट होत आहे
शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदावर उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे हयात असताना निवड झाली. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून तेव्हाच त्यांची निवड करण्यात आली. मात्र, असे असताना शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे यांनाच तुम्ही विरोध करत आहात हे स्पष्ट होत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपमध्ये सातत्याने अपमान होत आहे का, असा प्रश्न विचारला असताना सुप्रिया सुळे उत्तर देताना म्हणाल्या की, त्यांना जर ते अपमान चालत असतील तर आपण काय म्हणायचे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेबांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि वक्तृत्वाची देणगी लाभली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"