मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेच्या पोस्टवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
केतकी चितळेला मी ओळखत नाही. मात्र अशा पद्धतीनं पोस्ट करणं, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची कामना करणं गैर आहे. ही आपली संस्कृती नाही, असं सुळे म्हणाल्या. या प्रकरणी कायदा आपलं काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल बीकेसीमधील जाहीर सभेतून समाचार घेतला. तर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करत केतकी चितळेवर सडकून टीका केली. ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती, अशा शब्दांमध्ये राज यांनी चितळेच्या पोस्टवर टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केतकी चितळेचा निषेध केला.
केतकी चितळेचा निषेध करणाऱ्या ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांचे सुप्रिया सुळेंनी आभार मानले. हीच आपली मराठी संस्कृती असल्याचं सुळे म्हणाल्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी त्यांना धन्यवाद देते. हीच आपली संस्कृती आहे. एका मध्यमवर्गीय मराठी घरात जन्मल्यानं माझ्यावर काही संस्कार झाले आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं सुळेंनी म्हटलं.