मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याने, सत्तेवरून पायउत्तार झालेल्या भाजपचे नेते महाविकासआघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपचे आमदार राम कदम यांनी आगामी अधिवेशनावरून सरकारवर ट्वीटरवरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी उत्तर दिले आहे. राम कदमांना सगळीकडे पिवळं दिसतंय त्यांची अवस्था कावीळग्रस्तासारखी झाली असल्याचा टोला मलीकांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. तर सरकारच्या कामाची अजब पद्धत आहे. हिवाळी अधिवेशनात आमदाराना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध घालण्यात आले असून प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, अशी टीका राम कदम यांनी केली होती.
त्यामुळे राम कदम यांनी केलेल्या आरोपांचा नवाब मलीक यांनी समाचार घेतला आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला आमदार नवाब मलिक यांनी लगावला. तर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) 30 दिवस आधी देणे अपेक्षित असते. विधानसभा गठीत झाल्यानंतर तीस दिवसांचा अवधी मिळाला नसल्याने ते प्रश्न विचारु शकत नाहीत. मात्र सदनात लक्षवेधीद्वारे आमदार प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात, याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली.
पुढे बोलताना मलीक म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला सर्व पक्षांचे गटनेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे, त्यामुळे कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते, अशी जोरदार टीका सुद्धा नवाब मलिक यांनी केली.