NCP: अजितदादांच्या बंडापूर्वी २ दिवसाआधीची ती सिक्रेट बैठक, तिथूनच बसला शरद पवारांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:02 AM2023-07-06T10:02:47+5:302023-07-06T10:03:31+5:30
NCP News: आमदारांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच पक्षाचं नाव आणि चिन्ह राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर कब्जा करण्यासाठी मजबूत दावेदारी केली जात आहे.
अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हावर कब्जा करण्यासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच पक्षाचं नाव आणि चिन्ह राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर कब्जा करण्यासाठी मजबूत दावेदारी केली जात आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसमधील जाणकारांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाची पटकथा आधीची लिहिली गेली होती. मात्र या सर्व हालचालींची कानोकान खबर शरद पवार यांना लागू दिली गेली नाही. एवढंच नाही तर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्याचा निर्णय ३० जून रोजी झालेल्या एका बैठकीत झाला होता.
समोर येत असलेल्या माहितीनुसार अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक बोलावली होती. या बैठकीबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात आली. या बैठकीत एक प्रस्ताव मांडण्यात आला. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवून अजित पवार यांची नवे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात येत आहे, असा उल्लेख या प्रस्तावामध्ये होता. हा प्रस्ताव या बैठकीत पारित करण्यात आला. एवढंच नाही तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलं आणि पक्ष आणि चिन्हावर दावा केला. कार्यकारिणीच्या बैठकीत जो प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जन कल्याणाच्या उद्देशापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या जागी अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत आहे, असेही या प्रस्तावात म्हटले होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करत अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे गेले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत कुणीही राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क सांगितल्यास त्यावर निर्णय देण्याआधी निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं आधी ऐकलं पाहिजे, असं पत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे जात पक्ष आणि चिन्हावर दावा केला. अजित पवार यांच्या गटाने दिलेल्या शपथपत्रामध्ये ४० हून अधिक आमदार, खासदार आणि विधान परिषदेतील आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काल झालेल्या अजित पवार यांच्या बैठकीला ३१ ते ३२ आमदार उपस्थित होते. मात्र काही आमदार बाहेर असल्याने बैठकीला ते उपस्थित राहू शकले नव्हते.
दरम्यान, पक्षात बंडखोरी करून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. दरम्यान, दुसरीकडे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याची सूचना दिली आहे.