सांगली : राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. गुरुवारी सकाळी लाड उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्यात दाखल झाले.भाजपने या मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांना दोन दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महिन्यापूर्वीपासून अरुण लाड यांचे नाव चर्चेत होते. त्यांनीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. श्रीमंत कोकाटे व त्यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यर्त्यांची उत्सुकता ताणली गेली होती.
गुरुवारी सकाळी आठ वाजता जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे अरुण लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर लाड समर्थकांनी जल्लोष केला. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लाड गुरुवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य राष्ट्रवादी नेत्यांबरोबर सकाळी लाड यांनी चर्चा केली.क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांचे पुत्र म्हणून लाड यांच्यावर सामाजिक कार्याचा प्रभाव आहे. २००५ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र त्यांनी जोरदार लढत दिली होती. सहकारी कारखाना व अन्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारी मिळणार हे गृहीत धरुन त्यांनी तयारी सुरू केली आहे.जिल्ह्यास आणखी एक आमदारकी पक्कीपुणे पदवीधर मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या भाजप व राष्ट्रवादीने सांगली जिल्ह्याला उमेदवारी दिली आहे. जनता दलातर्फे जिल्ह्यातीलच प्रा. शरद पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोणीही निवडून आले तर आमदारकी जिल्ह्याला मिळणार आहे.