आॅनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 2 - महिन्याभरात पक्षाची जिल्ह्यासह तालुकानिहाय कार्यकारिणी झाली पाहिजे...चांगली कामगिरी न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवणार...पक्षात कुणाचीही मक्तेदारी नाही हे लक्षात घ्या...गटातटाचे राजकारण न करता पक्ष विस्ताराचे काम करा...पदाचा वापर स्वत:च्या हिस्सेदारीसाठी करु नका...आमदाराचा पुतण्या पुढाऱ्यांचा मुलगा म्हणून संघटनेत पदे देऊ नका...अशा कानपिचक्या देत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. येणाऱ्या काळात दोन खासदार व दहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहीजेत, यासाठी तयारी लागा, असे आवाहनही त्यांनी केले. ताराबाई पार्कातील शासकिय विश्रामगृह येथील छत्रपती शाहू सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आदींची होती.बैठकीत तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश युवक उपाध्यक्ष, शहर युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा पवार यांनी आढावा घेतला. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदिल फरास, शहरयुवक अध्यक्ष अमोल माने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अवधूत अपराध यांच्यासह तालुकाध्यक्षांनी आपल्या पक्ष संघटनेतील कामाची माहिती दिली. काही ठिकाणी कार्यकारीणी अपूर्ण आहे, काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड झालेली नाही, तसेच पक्षांतर्गत गटबाजीही यावेळी समोर आल्याने अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कानमंत्र दिला.दोन महिन्यात विद्यार्थी संघटनांच्या तालुका व नगरपालिकानिहाय कार्यकारीणी तयार करुन महाविद्यालयांमध्ये पक्षाच्या विद्यार्थी संघटनांच्या शाखा काढा,संघटनेत पदे देताना पक्षाच्या आमदाराचा पुतण्या, पुढाऱ्याचा मुलगा घेऊन जागा अडवू नका. त्यांच्यात योग्यता व पात्रता असेल तर विचार होऊ शकतो, पक्षाला कर्तुत्ववान कार्यकर्त्यांची गरज असल्याने त्यांना पदे देताना त्यांचा जात,पात, धर्म बघू नका. अशा सुचना अजितदादांनी केल्या. कार्यकर्ता हा पक्ष संघटनेचा कणा असल्याने जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदांवर महिन्याभरात कार्यकर्त्यांच्या नियक्तया करा, यामध्ये बदनाम व्यक्तिांना पदे देऊ नका तसेच आपल्याला गटातटाचे राजकारण करायचे नसून पक्ष विस्तार करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.अजितदादा पवार म्हणाले, येणाऱ्या काळात जिल्ह्यात दोन खासदार व दहा आमदार हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच निवडून आले पाहीजेत. कुठल्या पक्षाशी आघाडी होईल हे न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आघाडीचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील.सुनील तटकरे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाच्या मार्केटींगमध्ये आपण कमी पडलो. सध्याचे राज्यकर्ते हे फक्त घोषणाच करत असून त्याची अंमलबजावणी करत नाही. घर तिथे पक्षाचा झेंडा व गाव तिथे शाखा यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. राष्ट्रवादीचे सदस्य करताना पदाधिकाऱ्यांनी २२ ते २६ वयोगटाचा तरुण समोर ठेवावा.
पक्ष कुणाची मक्तेदारी नाही
बारामती म्हणजे अजित पवार नव्हे तर त्या ठिकाणी दुसरी माणसेही आहेत, असे उदाहरण देऊन पक्ष कुणाचीही मक्तेदारी नसल्याचे सांगत नवीन माणसं तयार करा, असा उपदेश अजितदादांनी यावेळ पदाधिकाऱ्यांना केला.