खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागतोय? प्रफुल्ल पटेलांनी खरं कारण सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:42 PM2023-07-13T15:42:43+5:302023-07-13T15:44:11+5:30
Praful Patel: खातेवाटपावरुन मतभेद असल्याने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात आहेत. अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यास शिंदे गटासह अन्य समर्थक आमदारांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. अशातच यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी दिल्ली गाठली. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही दिल्लीत होते. या दोघांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.
खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांच्याबरोबर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली.
खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागतोय?
सध्याच्या मंत्र्यांमध्ये (भाजपा – शिंदे गट) आधीच खातेवाटप झाले आहे. काही खाती भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडे आहेत, तर काही खाती ही शिंदे गटातील मंत्र्यांकडे आहेत. सर्व खाती त्यांनी वाटून घेतली आहेत. आता आम्ही सत्तेत सामील झाल्याने कोणाकडून कोणते खाते काढून घ्यायचे आणि आम्हाला द्यायचे, त्याचबरोबर त्या मंत्र्याचे खाते काढून घेतल्यावर त्याला दुसरे कोणते खाते द्यायचे यावर विचार सुरू आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, आम्हाला काही खाती दिल्यावर आधीच्या मंत्र्यांना दुसरी खाती द्यावी लागणारच आहेत. आम्ही सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या खातेवाटपासंदर्भात सुरुवातीचे चार-पाच दिवस कोणतीही चर्चा झाली नव्हती. मागील दोन दिवसांपासून आम्ही हा विषय हाती घेतला आहे. यावर सखोल चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये यावरून कोणताही वाद नाही. चर्चा पूर्ण झाल्यावर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होईल, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.