मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ७ दिवसांच्या उपचारानंतर अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच ट्विटरवरुन दिली. कोरोनामुक्त झाल्यानंतर पवारांनी डॉक्टर, मित्रपरिवार, सहकारी आणि शुभचिंतकांचे आभार मानले आहेत ज्यांनी पवारांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती.
मागील २४ जानेवारी रोजी शरद पवारांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. पवारांच्या ट्विटनंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. विविध क्षेत्रांतील मंडळीकडून पवारांच्या तब्येतीबद्दल विचारपूस होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर तातडीने त्यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
रोहित पवारांनी केली होती भावूक पोस्ट
शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी भावूक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले होते की, आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता. पण आज तुम्ही केलेल्या कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ट्विटमुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. पण मला माहिती आहे की, योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरे व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ९ हजार ९१८ नवे रुग्ण
देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ झाल्याचं दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांमध्ये देशात २ लाख ९ हजार ९१८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार २६८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा १५.७७ टक्के इतका झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९५९ जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ६२ हजार ६२८ जणांनी कोरोनाच्या आजारावर मात केली आहे. देशात १,६६,०३,९६,२२७ जणांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रविवारी २२ हजार ४४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर ३९,०१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१४ टक्के इतका झाला आहे. रविवारी राज्यात ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला