अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पक्षातील फुटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्रिपद दिले असल्याचा खोचक टोला पवारांनी लगावला.
यावेळी शरद पवार म्हणाले, अलीकडेच देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे म्हटले. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. मला आनंद आहे, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनाच शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा मी आभारी आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
तसेच आजची घडामोडी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे का? त्यांनी टाकलेली गुगली आहे का? या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी भाजपाला टोला लगावला. "ही गुगली नसून हा दरोडा आहेकारण ही कोणती छोटी बाब नाही", असे पवारांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, ६ जुलै रोजी पक्षाची बैठक बोलावली होती, मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली, हे लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, १९८० साली मला अनेक जण सोडून गेले होते, तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं, त्यापैकी ३ ते ४ जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असेही पवारांनी सांगितले.