‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा दिला आहे. येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायीक आणि सर्वसामान्य नागरिकांची शरद पवार यांनी भेट घेतली. मंगळवारी त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवेआगर आणि श्रीवर्धन येथील नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मशिदी, मंदिर, शेती, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूंच्या बागांची शरद पवारांनी पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी पश्चिम बंगालला केंद्रानं पॅकेज दिलं ते चांगलंच झालं. त्या ठिकाणी १८ जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा,' अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
लातूरमधील किल्लारी सारखी योजना या भागात करण्यासाठी काही अडचणी आहेत. इथे जमीन कमी आहे, इथली घरे दुरुस्त करण्यासाठी, लोकांना अधिवास निर्माण करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना थेट मदत कशी देता येईल यावर भर देण्यात येणार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करण्याची गरज आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे, असं शरद पवरांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारमार्फत योग्य ती मांडणी करावी लागेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोकणवासीयांनो, चिंता करु नका. आपण या संकटातून बाहेर पडू, असाही विश्वास देत आवश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना दिल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
धक्कादायक! कोरोनाच्या रुग्णाला मनसेच्या नेत्याने रुग्णालयातून पळविले; पोलिसांत तक्रार दाखल