छत्रपती संभाजीनगर - कुणीतरी मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, चुकीचा असेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप लावला आहे. कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यातून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले.
शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची असते. परंतु राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यातून २ समाजात जातीत आणि धर्मात कटुता निर्माण व्हायला लागली तर ते चांगले लक्षण नाही. हे सगळे घडवले जात आहे. औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचे, आंदोलन करण्याचे काय कारण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत फोटो दाखवला त्याने कुणाला काय पडलंय, ओडिशात आणि काही राज्यात चर्चेवर हल्ला केला जातो. चर्च आणि ख्रिश्चन समाज शांतता प्रिय असतो. एखाद्याची चूक असेल तर पोलीस कारवाई करेल. धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची गरज नाही. हे जे काही घडतेय ते सहजासहजी एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यामागे विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.
कोल्हापूरात काय घडलं?सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचे व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. याठिकाणी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. तिथे शहरातील दैंनदिन व्यवहार ठप्प होते. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमा होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत होते. दरम्यान या काळात काही परिसरात दगडफेक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्जचा वापर केला. सध्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणात ६ जणांना अटक केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.