Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि उत्सुकता नाशिक पदवीधर मतदारसंघाची आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारलेल्या एका नेत्याने बंडखोरी करत पक्षाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून, या निवडणुकीत जिंकून येणार तसेच त्यानंतर शरद पवार यांना भेटायला जाणार, असा निर्धार व्यक्त केला आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोरी कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रदीप साळुंके नॉट रिचेबल होते. अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर हे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. मी बंडखोरी केलेली नाही. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. संधी मिळत नसेल, तर संधी खेचून आणली पाहिजे, हा पवार साहेब यांचा आदेश आहे. त्या आदेशाचे मी पालन करतो, असे साळुंके यांनी म्हटले आहे.
माझ्या पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न आहे
१४ वर्षे झाली. विक्रम काळे आमदार आहेत. त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. पक्षाची तिकीट द्यायची इच्छा नव्हती. पण, त्यांनी काय जादू केली हे मला माहीत नाही. सिटींग आमदार असल्याने त्यांना तिकीट द्यावे लागले असेल. मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, तुम्ही आमचे प्रतिनिधी व्हा, असे सांगत, माझी उमेदवारी ही माझ्या पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न आहे. मी आमदार काळे यांना आव्हान केले होते की, तुम्ही पक्ष वाढविला आहे का. मला भेटावे. मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. त्यांनी पक्ष कुठेच वाढविला नाही. शरद पवार यांच स्वप्न पूर्ण होणार कसे. त्यासाठी माझ्यासारखे सच्चे कार्यकर्ते पुढे आले पाहिजे, असे साळुंके यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून फॉर्म भरला
कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून फॉर्म भरला. संधी खेचून आणायच्या प्रक्रियेला बंडखोरी म्हणतात, असं म्हटल्यावर त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही द्या, असे साळुंके यांनी सांगितले. उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी प्रयत्न केले. स्थानिक नेत्यांनी विनंत्या केल्या. फोन करण्याचे प्रयत्न केले. त्यांचे आभार मानतो. पण, त्यांना माहिती आहे प्रदीप साळुंके हा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षासाठी नोकरी सोडली. मी पक्ष बांधणीचे काम केले. माझी कुठेही संस्था नाही, असे ठामपणे साळुंके यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"