NCP ajit pawar Candidate second List : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सात उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी अजित पवारांनी ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. उर्वरित १० उमेदवारांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या यादीत आमदार झिशान सिद्दीकी यांचेही नाव आहे. मात्र नवाब मलिक यांचे नाव दुसऱ्या यादीतही नसल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. मात्र नवाब मलिकांबाबतच्या चर्चा तथ्यहीन असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. झिशान सिद्दीकी हे सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्वमधून वरुण देसाई यांना तिकीट दिले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिले आहे. याशिवाय इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महाकाळमधून संजयकाका रामचंद्र पाटील, अणुशक्ती नगरमधून सना मलिक, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरूरमधून ज्ञानेश्वर (माऊली) कटके आणि लोहामधून प्रताप पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र या यादीत नवाब मलिक यांचे नाव असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱ्या यादीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला तिकीट देण्यात आले आहे. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसने सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांनीही विरोध केला होता. त्यामुळेच नवाब मलिक यांना उमेदवारी दिली नसल्याचे वृत्त समोर आलं होतं.
नवाब मलिकांबाबतच्या चर्चा तथ्यहीन - अजित पवार
नवाब मलिक यांना उमेदवारी देणार येणार नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये सुरु आहे. मात्र अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा या तथ्यहीन असल्याचे अजित पवार यांनी स्पक केलं आहे. नवाब मलिक यांच्याबाबत अद्यापही चर्चा सुरु असून कदाचित त्या अनुषंगाने संध्याकाळी एक बैठक होऊ शकते. त्यानंतर नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही हे स्पष्ट होईल. उरलेल्या उमेदवारांमध्ये नवाब मलिक यांचे नाव असण्याची दाट शक्यता आहे.