पंढरपूर: आताच्या घडीला महाराष्ट्राती राजकारण विविध मुद्द्यांमुळे ढवळून निघत आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा उपस्थित केलेला मुद्दा आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर ईडीने कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ पुन्हा एकदा घसरली. यावरून अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शरद पवार यांचे नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही संजय राऊतांच्या वाणीवर नाराजी व्यक्त करत सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केली. संजय राऊत यांच्या या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच रोहित पवार यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर झालेली ईडीची कारवाई आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले.
शब्द जपून आणि मोजून वापरले पाहिजेत
सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत. केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोलले पाहिजे. एखाद्याच्या राहत्या घरी, जिथे तुमचे कुटुंब राहते तिथे राजकीय हेतून कारवाई झाली तर माणूस भावनिक होत असतो. एखादी व्यक्ती खूपच जास्त भावनिक झाली तर कधी कधी शब्द वेगळ्या अर्थाने निघू शकतात. अशा ठिकाणी आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले.
अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात
शब्द सर्वांनीच जपून वापरले पाहिजेत. अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात. एखाद्या कुटुंबावर कारवाई होते, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य राजकीय लोक नसतात. त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. लोकं घाबरतात, कुठेतरी टेन्शन घेतात. अशा प्रकारचे नवीन राजकारण सुरु झाल्याचे सध्या दिसत आहे. महाराष्ट्रात असे यापूर्वी नव्हते. महाराष्ट्रातील लोकांना हे सगळे समजत आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे महाराष्ट्रातील लोकांच्यावतीने या ठिकाणी सांगतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी वेगळ्याच टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपने केला आहे, असा आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत अटक झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली.